महाराष्ट्र

प्राध्यापकांची तत्काळ पदे भरा

महासंदेश : विद्यापीठ आणि महाविद्यालयात शंभर टक्‍के प्राध्यापकांची तत्काळ पदे भरावीत, तासिका तत्वावरील धोरण बंद करावी, या प्रमुख मागण्यासाठी दि. 21 जून रोजी उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीने म्हटले आहे.

उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत संघटनेच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक संस्थांमध्ये 100 टक्‍के प्राध्यापकांची नियुक्‍ती करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र राज्य शासनाकडून अजूनही प्राध्यापक भरतीसाठी पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे प्राध्यापकांची शंभर टक्‍के पदे तातडीने भरावीत. तसेच प्रचलित तासिका तत्वावरील (सीएचबी) पद्धत बंद करावी. “समान काम समान वेतन” या तत्त्वानुसार सेवाशर्ती नुसार वेतन देण्यात यावी. त्याचप्रमाणे आरक्षणासाठी विभाग व विषय एकक न मानता विद्यापीठ महाविद्यालय एकक माणून सहाय्यक प्राध्यापक भरती करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीचा विचार करता किमान एक वर्ष तरी प्राध्यापक भरतीसाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतर पात्र उमेदवारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून, आता उमेदवारांकडून आंदोलनाचे हत्यार उपसले जात आहे.

यासंदर्भात नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक प्रा. सुरेश देवढे-पाटील म्हणाले, प्राध्यापक भरतीसाठी आतापर्यंत निवेदन, बैठक, संवादातून मिळालेल्या आश्‍वासनांची पूर्तता अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रमुख तीन मागण्यांचे शासन निर्णय निघत नाहीत तोपर्यंत आंदोलनाचा लढा सुरूच राहील.

Back to top button