अहमदनगरमहाराष्ट्र

बाळ बोठेसह सात आरोपीविरोधात पारनेर न्यायालयात ४५० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल

रेखा जरे खून प्रकरण

महासंदेश :  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्यासह एकूण सात आरोपींविरोधात मंगळवारी तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी पारनेर न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले.

बाळ बोठे, जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकली, पी. अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व रा. हैदराबाद) व महेश वसंतराव तनपुरे (रा. अहमदनगर) यांच्या विरोधात 450 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

 बोठे याच्याविरोधात कट रचून खून करणे तर उर्वरित सहा आरोपींविरोधात फरार आरोपींना मदत करणे या कलमांतर्गत दोष ठेवण्यात आला आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत छडा लावत अत्यल्प काळात यातील पाच संशयित आरोपींना जेरबंद केले. त्यातील संशयित आरोपी सागर भिंगारदिवे यास ताब्यात घेतल्यानंतर जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे तपासात समोर आले. तथापि, तेव्हापासून बोठे पसार होता.
बोठे हा विविध ठिकाणी वेषांतर करून पोलिसांना गुगारा देत असे. सर्वात जास्त काळ तो हैद्राबाद येथील बिलालनगरमध्ये लपून होता. त्यानंतर त्याला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने चार ते पाच ठिकाणी स्थलांतर केले. मात्र, शेवटी हैद्राबादमधील बालाजीनगर भागातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले होते. बोठेला मदत करणार्‍या एक वकीलासह चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच  नगर येथून महेश तनपुरे याने मदत केली होती.

Back to top button