अहमदनगरमहाराष्ट्र

बिबट्यासाठी सावज ठेवले मात्र घडले भलतंच!

अहमदनगर:
बिबट्या पकडण्यासाठी सावज म्हणून पिंजर्‍यात ठेवलेला बोकडच अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी अथवा टारगटांनी तो चोरला असल्याची चर्चा आहे.

श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात भागात असणार्‍या सुर्यनगर परिसरातील नागरिकांना गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. या बिबट्याने एका हरीण मादीची देखील त्याठिकाणी शिकार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते.

त्यामुळे सूर्यनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार वन विभागाने सूर्यनगर भागात बिबट्याचा पिंजरा लावला होता. बिबट्या पिंजर्‍यात अडकण्यासाठी सावज म्हणून हा बोकड पिंजर्‍यात ठेवण्यात आला होता. परंतु काल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बिबट्याच्या पिंजर्‍यातील बोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे.

हा बोकड कोणी चोरून नेला त्याचा शोध सुरु आहे. जनावरे चोरणार्‍या चोरट्यांनी किंवा बोकड पार्टी करण्यासाठी काही टारगट पोरांनी बोकडाची चोरी केली असावी, अशी चर्चा या भागात सुरु आहे.

Back to top button