अहमदनगरकृषी

बीज प्रक्रियेशिवाय पेरणी करू नये : शिवाजीराव जगताप

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत नेप्तीत शेतकर्‍यांना बियाण्यांचे वाटप
अहमदनगर : बीज प्रक्रिया हे एक साधे तंत्रज्ञान असून, पीक उत्पादनवाढीसाठी त्याचा खूप मोठा फायदा होतो. या प्रक्रियेमुळे 15 टक्के अधिकचे उत्पादन मिळते. जमिनीतून होणार्‍या रोगापासून पिकाचा बचाव होतो. त्यामुळेच प्रत्येक शेतकर्‍याने बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हावे. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले
नेप्ती येथे कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत (2021-22) शेतकरी प्रशिक्षण वर्गाप्रसंगी जगताप व जि. प.चे माजी सदस्य अरुण होळकर यांच्या हस्ते शेतकर्‍यांना बाजरी व मुगाच्या बियाण्यांचे वितरण संपन्न झाले. यावेळी जगताप बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, सरपंच सुधाकर कदम, क्रांती चौधरी, संजय जपकर, मंडळ कृषी अधिकारी जगदीश तुंभारे, शंकर खाडे, श्रीकांत जावळे, उमेश डोईफोडे, स्नेहालयचे गणेश सानप, बी. आर. कर्डिले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगताप म्हणाले की, कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नेहमीच प्रयत्ननशील असतात. शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढावे, तसेच त्यांच्या खिशात जास्त नफा पडावा, यासाठी विविध उपाययोजना आहेत. यासाठी कृषी विभाग शेतकर्‍यांबरोबर आहे. कृषी विभागातील प्रत्येक कर्मचारी शेतकर्‍यांच्या बांधावर उभा आहे. पडणारे पावसाचे पाणी जमिनीत थांबवायचे असेल, तर पेरणीसाठी सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. शिफारशीनुसार खते द्यावीत. कंपोस्ट खताचा वापर करावा. जैविक प्रक्रिया करावी. आपल्या शेतात आपणच प्रयोग करावेत. जोपर्यंत जमिनीची जडणघडण होत नाही तोपर्यंत उत्पन्न वाढत नाही, असे ते म्हणाले.
अरुण होळकर म्हणाले की, शेतकर्‍यांनी शासकीय योजनांचा फायदा घेऊन आपले उत्पादन वाढवावे. कृषी अधिकारी हा शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पोहोचला आहे. त्याचा फायदा घ्यावा. शेतकरी पिकवतो परंतु त्याला विक्री व्यवस्थापनाचे पूर्ण ज्ञान नसल्याने तोट्यात जातो. कृषी विभागाने इतर मार्गदर्शन करण्याबरोबरच प्रशिक्षणाच्या माध्यमातून विक्री व्यवस्थापनाबाबतची सविस्तर माहिती शेतकर्‍यांना दिल्यास याबद्दल सखोल मार्गदर्शन केल्यास त्याच्या उत्पादनात व उत्पन्नात निश्चितच वाढ होईल, असे ते म्हणाले.
गहिनीनाथ कापसे म्हणाले की, शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरावी. शेतकर्‍यांनी भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करावी. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थापन सुविधा कृषी विभागाने केलेली आहे. जे विकत आहे, तेच शेतकर्‍यांनी पिकवावं, तरच शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे ते म्हणाले.
पोपटराव नवले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. साखर संचालनालयाच्या कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी मार्केटिंगविषयी माहिती दिली. श्जगदीश तुंभारे यांनी आभार मानले.

Back to top button