Travelअहमदनगरमहाराष्ट्र

बेकायदा वृक्षतोड प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात ; अधिकाऱ्यांवरील कारवाई टाळण्यासाठी दबाव

महासंदेश : पाथर्डी तालुक्यातील केळवंडी परिसरात वनविभागाच्या हद्दीतील डोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोड प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात असून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी दिली. 

वृक्षतोड करून लाकडाचे ढीग लागेपर्यंत स्थानिकांनी दुर्लक्ष का केले या  मुद्द्यावरून अधिकारी अडचणीत येण्याची याची शक्यता आहे. दोषी वन अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या निसर्गप्रेमींनीवर त्यामुळे दबाव टाकला जात आहे.

माने यांच्या सखोल चौकशीच्या आदेशानंतर जिल्हा सहायक उपवनसंरक्षक सुनील पाटील यांनी मंगळवारी डोंगर परिसरात येऊन वृक्षतोडीची पाहणी केली. त्याचबरोबर विशेष फिरत्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. बेकायदा तोडलेल्या वृक्षांचे लाकडे वन विभागाने जप्त केली असून, तालुका वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात  ठेवली आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा उपवनसंरक्षक माने यांना पाठवला जाणार आहे. वृक्ष तोडणाऱ्यांसह दुर्लक्ष करून वृक्षतोडीला खतपाणी घालणाऱ्यांचा   शोध घेण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच डोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोडीच्या तपासासाठी वनक्षेत्रपाल फिरते पथक पाठवून अधिक तपास केला जाईल असे पाटील यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान गर्भगिरीच्या डोंगरांत झालेल्या वृक्षतोडीकडे वन खात्याचे लक्ष वेधणाऱ्या व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या निसर्गप्रेमीवर दबाव आणला जात आहे. अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून निसर्गप्रेमी व तक्रारदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी 21 जून रोजी उपोषणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम असल्याचे निसर्गप्रेमी भाऊसाहेब शिरसाट, रणजीत बेळगे व अरुण काशीद यांनी सांगितले.

Back to top button