बोठेने केला स्वस्त धान्य दुकानात फेरफार ; पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानातील धान्यामध्ये तफावत आढळून आल्याप्रकरणी नगर तालुक्यातील वाकळी येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराविरूद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण शिवाजी बोठे (रा. वाळकी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक वैशाली गजानन शिकारे (वय 35 रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
अरूण बोठे याचे वाळकी गावात सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान आहे. पुरवठा निरीक्षक वैशाली शिकारे यांनी अचानक बोठे याच्या धान्या दुकानाला भेट देऊन तेथील धान्याचा पंचनामा केला. यावेळी धान्यात तफावत व फेरफार केल्याचे निरीक्षक शिकारे यांच्या लक्षात आले. बोठे याच्या धान्य दुकानात गहू तीन हजार 691 किलो, तांदूळ चार हजार 473 किलो, हरबरा दाळ 248 किलो कमी आढळून आली. तर साखर 67. 5 किलो, मका 236 किलो अधिक आढळून आली. निरीक्षक शिकारे यांनी या धान्याचा पंचनामा करून बोठे विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहे.