अहमदनगरकृषी

भूखंड वाटपावरून सत्ताधारी संचालकांत नाराजी

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा कोरम अभावी रद्द

महासंदेश : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीने   भूखंड वाटपाच्या व महत्त्वाच्या विषयावर बोलविलेली  मासिक मीटिंग सत्ताधाऱ्यासह विरोधी संचालकांच्या नाराजीमुळे  रद्द करावी लागली. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलावलेली बैठकीला बहुतांश संचालक गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण झाला नाही. कोरम पूर्ण न झाल्याने रद्द करण्यात आलेली मासिक बैठक पुन्हा अजेंडा काढून लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती सहकारी संस्थेच्या सहाय्यक  निबंधक बि. के. कोठुळे यांनी दिली.

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी संचालक मंडळाची मुदत 30 मार्च रोजी संपलेली  आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकललेल्या आहेत. निवडणुका पुढे ढकललेल्या संस्थांना  ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ दिली असली तरी या काळात कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला  नाही. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीलाही 23 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. गेल्या पाच वर्षातील विद्यमान सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ विविध विषयांमुळे चर्चेत राहिला. काही संचालकांनी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हिताच्या निर्णयापेक्षा  स्वहित साधण्याचा धडाका लावल्याने बहुतांशी संचालक नाराज आहेत. त्याचाच फटका मासिक सभेला बसल्याचे बोलले जाते. नेतृत्वाला अंधारात ठेवून सुरू असलेल्या मनमानी कारभाराला  सत्ताधारी संचालकच वैतागले असून उघड नाराजी व्यक्त करू लागले आहेत. 62 भूखंड वाटपात गैरप्रकार झाल्याची तक्रार झाल्याने भूखंड वाटपासह  अनेक विषय वादग्रस्त राहिले. अपूर्ण राहिलेले विषय मार्गी लावण्यासाठी काही संचालकांनी  पुढाकार घेतला. शुक्रवार 11 जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृहात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भूखंड वाटप, भुखंड ट्रान्सफर करणे यासह शॉपिंगसेंटर व अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संचालक बाळासाहेब घुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. बैठकीसाठी अध्यक्ष बन्सी आठरे, उपाध्यक्ष मंगल गर्जे, संचालक पप्पू दहिफळे, विष्णू सातपुते या सह  सहाय्यक निबंधक भारती कोठुळे, सचिव दिलीप काटे उपस्थित होते. 22 संचालकांपैकी फक्त पाच संचालकच बैठकीला उपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण झाला नाही. संचालक हजर नसल्याने मासिक सभा रद्द करावी लागली. सोमवार 14 जून रोजी पुन्हा मासिक सभा बोलावली असल्याची माहिती सचिव दिलीप काटे यांनी दिली. सोमवारी होणाऱ्या मासिक सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button