मंत्र्यांच्या गावात रोहयोच्या कामात भ्रष्टयाचार होतो, करोना पॉझिटिव्ह रुग्ण कामावर दाखवले जातात, हे धक्कादायक : प्रविण दरेकर

मुंबई, दि. २२ – देशात करोनाने हाहाक्कार माजला असताना राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दुसरीकडे राज्यातील मंत्र्यांचा निष्काळजीपणाही समोर येत आहे. रोजगार हमी मंत्र्याच्या गावातच रोहयोच्या कामावर करोना संक्रमित रुग्ण काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाची तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
औरंगाबाद-बीड बायपासच्या कामावर बोगस कामगार व रोहयोचं काम दाखवून बील काढण्याच्या गंभीर प्रकरण समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, रोहयो मंत्री संदीपान भूमरे यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य आहेत, पुतण्या सरपंच आहे. रोहयो कामावर गडगंज श्रीमंत असलेले लोक कामगार म्हणून दाखवले आहेत. यातील पाच लोक तर कोविड रुग्ण आहेत. एकूणच हे गंभीर प्रकरण मंत्र्यांच्याच गावात घडले, बोगस यादी बनवल्याचेही समोर आले आहे. करोना रुग्ण कामावर कसे जाऊ शकतील, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला असून या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
कुंपणच शेत खायला लागलं तर अपेक्षा कोणाकडून ठेवायची ?
कुंपणच शेत खायला लागलं तर अपेक्षा कोणाकडून ठेवायची? रोजगार हमी मंत्र्यांच्या गावात गैरव्यवहार आणि बोगस कामं होणार असतील तर महाराष्ट्रातील जनतेला आपण काय न्याय देणार आहात? असे सवाल उपस्थित करत दरेकर म्हणाले, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सरकार नेमकं काय करू पाहत आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण संदीपान भूमरे यांनी दाखवून दिलं आहे. या सखोल गोष्टीची चौकशी करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई केली पाहिजे. रोहयाचे मंत्र्यांनी, कारवाई करू, असं विधान केलं असलं तरी त्यांच्याकडून कारवाई होईल, ही शक्यता फार कमी आहे. त्यामुळे या प्रकरणात अधिक गुंतगुंत निर्माण न करता ठाकरे सरकारने आपला ठाकरे बाणा दाखवत कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.