महाराष्ट्र

महापालिकांमध्ये महाविकास आघाडी राहणार का?

या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

महासंदेश : आगामी काळात मुंबई महापालिकेसह अनेक प्रमुख महापालिकांच्या तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यात भाजपला मात देण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी स्थानिक पातळीवरही आघाडीने निवडणुका लढणार की स्वबळ आजमावणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने केला आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतलेली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष सोबत नसतील तर आपणही स्वबळावर लढण्यास तयार असले पाहिजे, अशाप्रकारची रणनिती शिवसेनेने आखलेली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका मांडताना स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी एकत्रच लढेल ही शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळली आहे. स्थानिक समीकरणं जशी असतील त्यानुसार भूमिका ठरेल असेच सांगण्याचा मलिक यांनी प्रयत्न केला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. त्या त्या ठिकाणचे पक्षाचे स्थानिक नेते याबाबत निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहील, असे नवाब मलिक म्हणाले.

स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार असे नाही. जे काही निर्णय असतील ते स्थानिक पातळीवर घेतले जातील. याबाबत पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे, असेही मलिक यांनी पुढे नमूद केले. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. अशा ठिकाणी कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढताना दिसू शकतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी – शिवसेना लढतही होणार आहे, असे सांगताना ज्याठिकाणी दोन पक्षांची वा तीन पक्षांची आघाडी करायची गरज असेल त्याठिकाणी त्याबाबत विचार केला जाईल. स्वबळावर लढण्याची गरज असल्यास तेव्हाची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Back to top button