Uncategorized

महिला पोलिस हवालदारकडून पेट्रोल टाकून सासूला जाळण्याचा प्रयत्न, सासू गंभीर, सून अटकेत

महासंदेश : महिला पोलिस हवालदाराने कोरोनातून बऱ्या झालेल्या ८० वर्षाच्या सासूला पेट्रोल, डिझेल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न कसबा बावडा परिसरात घडला. यामध्ये सासू जखमी झाल्या आहेत. शाहूपुरी पोलिसांनी संशयित संगीता राजेंद्र वराळे (वय ५१, रा. घ.नं. ७००, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कसबा बावडा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. जखमी सासू आशालता श्रीपती वराळे (वय ८०, रा. डॉ. आंबेडकर नगर, कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजता घडली.

शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. संशयित संगीता वराळे या पोलिस मुख्यालयात हवालदार या पदावर काम करत असून त्यांचे पती शेती करतात. त्या लाईन बाजार येथे राहतात. संशयित संगीता वराळे यांच्या सासू आशालता यांना कोरोना झाला होता. त्यामुळे सासूच्या सेवेसाठी त्या लाईन बाजारहून कसबा बावडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे पतीच्या घरी रहायला गेल्या. त्या ठिकाणी वराळे यांचे एकत्रित कुटुंब राहते. संगीत वराळे यांच्यासह अन्य नातलगांनी काळजी घेतल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारास असलेली सासू बऱ्या झाल्या. त्यानंतर त्यांना घरी आणले.

संशयित संगीता यांच्यासह वराळे कुटुंबातील सर्व सदस्य आशालता यांची सेवा करत होते. पण पूर्वी कौंटबिक आणि सांसारिक वादामुळे संगीता व सासू आशालता यांच्यात वाद व्हायचे. या वादाचा राग मनात धरुन रविवारी मध्यरात्री एक वाजता संशयित पोलिस हवालदार संगीता यांनी सासूच्या तोंडावर पेट्रोल किंवा डिझेल ओतले.त्यानंतर त्यांच्या तोंडावर पेटता कागद फेकला. त्यांच्या अंगावर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या साडीने पेट घेतल्याने त्या ओरडत घराबाहेर आल्या.

ओरडण्याच्या आवाजाने संशयित संगीता यांचे नातेवाईक जागे झाले. त्यांनी आशालता यांना कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात हलवले. त्यानंतर अधिक उपचारासाठी कसबा बावड्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. सासू आशालता यांच्या तोंडास, मानेस व उजव्या हातापायास गंभीर जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेची माहिती कळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन हवालदार वराळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली.

Back to top button