मोकाट जनावरे,कुत्रे व डुकरांचा सुळसुळाट

अहमदनगर : नगर शहरामध्ये मोकाट जनावरे कुत्रे व डुकरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढला आहे या त्रासाला नागरिक त्रस्त झाले आहे. यासाठी मनपाच्या वतीने उपाययोजना करण्यासाठी आरोग्य समितीच्या वतीने महापालिकेत बैठकीचे आयोजन करून उपाययोजना करण्याच्या सूचना डॉ.सतीश राजूरकर यांना देण्यात आल्या.
यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सदस्य नगरसेवक निखिल वारे,नगरसेवक सचिन शिंदे, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव,सा.कार्यकर्ते संजय ढोणे,अजय चितळे, सतिष शिंदे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी समितीच्या वतीने बैठकीमध्ये विविध सूचना देताना सांगितले की, शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट व उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे नागरिक त्रस्त झाले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मोकाट कुत्रे हे लहान मुलांबरोबर जेष्ठ नागरीक व रात्री अपरात्री येणाऱ्या नागरिकांवर टोळक्याने कुत्रे हल्ले करत आहे, दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, यासाठी कुत्रे पकडण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. सोमवार ते गुरुवार नगरसेवकांच्या व नागरिकांच्या तक्रारी नुसार व प्रभागानुसार कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घ्यावी तसेच शुक्रवार ते शनिवार नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करावे,कुत्रे पकडणाऱ्या गाडीवर जीपीएस लावावे व पकडणाऱ्या कुत्र्यांचे फोटो व शूटिंग याचा संग्रह करून ठेवावा,कुत्र्यांच्या निर्बीजीकरन केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत जेणेकरून कुत्र्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल आदींसह विविध उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
तसेच ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
नगर शहरासह उपनगर भागामध्ये डुकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाली आहे यावर उपाययोजना करण्याची मागणी समितीने केल्यानंतर डॉ.राजूरकर यांनी सांगितले डुकरांचे पालन करण्यास शहरात मनाई आहे. जर कोणी मालक डुकराचे पालन करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.