महाराष्ट्र

या रस्त्याच्या उड्डाणपुलाच्या निधीचा मार्ग मोकळा ; अंदाजपत्रकात तरतुदीस स्थायीची मान्यता

या रस्त्याच्या उड्डाणपुलाच्या निधीचा मार्ग मोकळा ; अंदाजपत्रकात तरतुदीस स्थायीची मान्यता 

महासंदेश : सिंहगड रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलासाठीच्या सुधारित खर्चास पुढील आर्थिक तरतुदीसाठी 72 (ब) नुसार मान्यता देण्यात आली आहे. या पूर्वी 2019 मध्ये या पूलाच्या 120 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. 

आता करोनास्थिती तसेच वाढीव दराने निविदा आल्याने सिंहगड रस्त्यावरील प्रस्तावित पुलाच्या पहिल्या निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांत “डीएसआर’मध्ये झालेले बदल तसेच पुलाच्या कामात काही प्रमाणात बदल करून प्रशासनाने मागील महिन्यात निविदा काढल्या आहेत. त्यामुळे हा सुधारित खर्च तसेच आर्थिक तरतुदीचा प्रस्ताव स्थायीत ठेवण्यात आला होता. त्यास समितीने मान्यता दिल्याचे समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले. 

सिंहगड रस्त्यावरची वाहतूक कोंडी लक्षात घेता, पुणे महापालिकेने या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. 2018-19 मध्ये यासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर सल्लागाराची नेमणूक करण्यात आली. या सल्लागरकडून प्राप्त झालेल्या 4 पर्यायांमध्ये उड्डाणपूल बांधण्याचे सूचवण्यात आले होते. यापैकी राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत पूल बांधला जाणार आहे. त्यात, राजारामपूल चौकात एक पूल तर विठ्ठल मंदिरापासून फन टाइमपर्यंत दुसरा पूल असेल. भविष्यात याच रस्त्यावर मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे या पूलाचा आराखडा करण्यापूर्वी महापालिकेने महामेट्रोकडे विचारणा केली होती. त्यात महामेट्रोने सकारात्मक अभिप्राय दिला असून, हा पूल मेट्रो प्रकल्पास अडथळा ठरणार नसल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार या पुलाचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे.

Back to top button