अहमदनगर

रस्त्याच्या प्रश्नावरून काँग्रेसचा मनपावर मंगळवारी आसूड मोर्चा

अहमदनगर : शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. शहर खड्ड्यांमध्ये हरवून गेले आहे. पावसाळ्यामध्ये नागरिकांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या प्रश्नावर आवाज उठवत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या त्याचबरोबर नगर शहरातील रस्त्यांच्या कामे पूर्ण करण्याच्या मागणी संदर्भामध्ये शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने मंगळवारी महानगरपालिकेवर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी दिली आहे. 

महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्र येत महापौर, उपमहापौर पदाची निवड केली आहे. त्यातच काँग्रेसच्या वतीने मागील अडीच वर्षांच्या भाजप, राष्ट्रवादीच्या सत्ता काळातील निष्क्रिय कारभाराची २४ मुद्द्यांची श्‍वेतपत्रिका प्रकाशित करत अनेक प्रलंबित प्रश्नांवर मनपा प्रशासन, सत्ताधारी आणि नागरिकांचे लक्ष वेधले आहे. मनपातील सत्तांतरानंतर काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे नगर शहरातील महाविकासआघाडीमध्ये संघर्ष पेटल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

मनोज गुंदेचा म्हणाले की, शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. नागरिकांना जीव मुठीत धरून शहरात वावरावे लागते. काँग्रेस ही नगर शहरातील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. जिथे सामान्यांचे प्रश्न असतील तिथे जिल्हाध्यक्ष काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ही नागरिकांच्या प्रश्नावर भूमिका घेण्यासाठी कायम पुढे असते. मंगळवारचा आसूड मोर्चा हा किरण काळे यांचे नेतृत्वाखाली महानगरपालिकेला रस्त्याच्या प्रश्‍नांवर जाब विचारासाठी काढला जाणार आहे. 

Back to top button