अहमदनगरमहाराष्ट्र

राज्य पुरस्कार विजेते शिक्षक प्रशांत खंडागळे यांना व्होडाफोन, आयडियाची एक लाखाची शिष्यवृत्ती जाहीर

अहमदनगर : रयत शिक्षण संस्थेच्या येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील राज्य पुरस्कार विजेते उपक्रमशील शिक्षक प्रशांत बबनराव खंडागळे यांना व्होडाफोन आयडिया मार्फत राष्ट्रीय स्तरावरील एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर झाल्याची माहिती प्राचार्य सुभाष ठुबे यांनी दिली.

  शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर व्होडाफोन आयडिया कंपनीमार्फत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. केंद्र सरकारच्या NSDL या बेंगलोरस्थित संस्थानमार्फत नामांकन प्रस्ताव, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक क्षेत्रातील कार्य, संशोधन,विविध पुरस्कार आदीबाबत छाननी करून शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. त्यातून ऑनलाइन मुलाखतीद्वारे दर्जेदार शिक्षकांची निवड करण्यात येते. चालू वर्षी देशभरातून ११० शिक्षकांची निवड करण्यात आलेली असून त्यात महाराष्ट्रातील सोळा जणांचा समावेश आहे. प्रशांत खंडागळे हे वरील चारही फेऱ्यांमध्ये यशस्वी होऊन त्यांना एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे. ही शिष्यवृत्ती दर्जेदार अध्यापनप्रणाली विकसित करण्यासाठी वापरावयाची असून त्यायोगे विद्यालयाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यास हातभार लागणार असल्याचे सुभाष ठुबे यांनी सांगितले.

खंडागळे यांना सन २०१९ चा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला असून त्यासह संस्था, संघटना व सामाजिक स्तरावरील सुमारे १५ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या १९ वर्षांच्या सेवाकाळात रयत विज्ञान परिषदेचे ३१ उपक्रम त्यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले आहेत. आय आय टी मुंबई व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे गणित विषयाचे राज्यस्तरीय मार्गदर्शक, शासनाच्या पर्यावरण सेवा योजनेचे योजनाप्रमुख व त्याद्वारे केलेले भरीव कामकाज, विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांतून प्रसिद्ध झालेले शोधनिबंध, शासकीय स्पर्धा परीक्षांतील विद्यार्थ्यांचे स्पृहणीय यश, शिक्षकांची प्रशिक्षणे, लॉकडाऊन कालावधीतील प्रभावी शैक्षणिक कामकाज यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याच्या कामगिरीमुळे त्यांना सदर शिष्यवृतीसाठी मानांकन मिळाले. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर, निसर्ग मित्र समिती अहमदनगर चे अध्यक्ष, रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक आदी पदांवर ते कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, मॕनेजींग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, समन्वय समितीचे सदस्य अशोक बाबर, ज्ञानदेव पांडूळे, विभागीय अधिकारी टी. पी. कन्हेरकर यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. परिसरातील शिक्षणप्रेमींकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Back to top button