अहमदनगरमहाराष्ट्र

राज्य मंत्री तनपुरे यांच्या आदेशाला केराची टोपली

ग्रामसडकचे अधिकारी व ठेकेदाराचा अनागोंदी कारभार
नगर, दि. (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील मांजरसुंबा-डोंगरगण शिव रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सुरू असून, या रस्त्यावरील पुलाच्या निकृष्ट कामाची नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पहाणी करून पूल काढण्याचे आदेश संबंंधित अधिकार्‍यांना दिले. मात्र, या अधिकारी व ठेकेदारांनी ना. तनपुरे यांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांसाठी जा-ये करण्याचा मुख्य रस्ताच खोदून बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
राहुरी-नगर मतदार संघातील आदर्श गाव मांजरसुंबा गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शिवरस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने झाले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्याघरात पाणी शिरले होते. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत शेतकर्‍यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना वारंवार चुकीच्या कामाची जाणीव करून दिली. मात्र, याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
त्यामुळे त्यांनी राज्य मंत्री तनपुरे यांच्याकडे या कामाची तक्रार केली. त्यांनी देखील तक्रारीची दखल घेत भर पावसात घटनास्थळी भेट दिली. व संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना सूचना करून दोन दिवसांत संबंधित पूल काढण्याचे सांगितले. मात्र, या घटनेला महिना उलटला असून, पहिले पाढे पचावन्न असेच म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

चौकट…
पूल ठेवला तसाच अन् रस्ता ठेवला खोदून
रस्त्याचा प्रश्‍न ना. तनपुरे यांच्या कोर्टात गेल्याने लवकरच त्याचे निरसन होईल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र, असे न होता त्यांच्या पदरात निराशाच पडली आहे. अधिकारी, ठेकेदाराने पूल ठेवला तसाच अन् रस्ता ठेवला खोदून असेच म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे मुख्य रस्ता बंद करून मोठी अडचन निर्माण केली आहे, असे बापू कदम यांनी सांगितले.

69 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button