अहमदनगर

राशीनचे दोन गुन्हेगार एका वर्षासाठी पाच जिल्ह्यातून तडीपार

अहमदनगर  : कर्जत तालुक्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सध्या कर्जत पोलिसांकडून सुरू आहे. राशीन येथील दोन जणांवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यांना नगर जिल्ह्यासह सोलापुर, बीड, औरंगाबाद, पुणे या पाच जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

 कर्जतसह इतर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुंडांचे तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील राम जिजाबा साळवे (वय-२६), सागर नवनाथ साळवे (वय-२४) दोघे रा.राशीन ता.कर्जत अशी तडीपार करण्यात आलेल्याची नावे आहेत. यांच्या विरुद्ध जमाव जमवून मारामारी, दरोडा, गंभीर दुखापत, असे गुन्हे दाखल असल्याने तसेच सामान्य नागरिकांच्या जिवीतास भय निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्फत कर्जत उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे कर्जत पोलिसांनी प्रस्ताव पाठविले होते. सदरच्या प्रस्तावांची चौकशी करून उपविभागीय दंडाधिकारी अर्चना नष्टे यांनी वरील दोन राम साळवे आणि सागर साळवे यास अहमदनगर, बीड, पुणे, सोलापूर, नाशिक अशा पाच जिल्ह्यातुन एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश जारी केले. सदरचे आदेश साळवे यांना बजावण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या सर्व प्रक्रियेचा पाठपुरावा केला. यासह त्यांना पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस कर्मचारी तुळशीराम सातपुते, सागर म्हेत्रे, भाऊ काळे, गणेश भागडे, देवा पळसे, अमित बर्डे, संपत शिंदे, गणेश ठोंबरे, जयश्री गायकवाड, कोमल गोफने यांनी विशेष सहकार्य केले. 

गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव यांचा प्रयत्न

कर्जत तालुक्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कर्जत पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे असतील त्याचा तपास लवकरात लवकर लावला जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर दहशत निर्माण होत गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कर्जत पोलीस विशेष परिश्रम घेत आहेत, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button