अहमदनगरमहाराष्ट्र

राष्ट्रीय पशुधन अभियानातील योजनांना 50 टक्के अनुदान

व्यक्ती व संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

        अहमदनगर, दि.28  - नवीन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गंत शेळी- मेंढी, कुक्कुट व वराह पालन तसेच पशुखादय व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडरब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी व्यक्ती व संस्थांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

         केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धनाव्दारे उदयोजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजूरी प्रदान केलेली आहे. अनुदानाची अधिकता मर्यादा शेळी मेंढी पालनाकरीता 50 लाख रूपये,  कुक्कुट पालनाकरीता 25 लाख रूपये, वराह पालनाकरीता 30 लाख रूपये आणि पशुखादय व वैरण विकास या साठी 50 लाख रूपये अशी आहे. प्रकल्पाकरीता स्वहिस्सा व्यतिरीक्त उर्वरीत आवश्यक निधी बँकेकडून कर्जाव्दारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. या योजनेचा व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता बचत गट, खाजगी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी सहकारी दूध उत्पादक संस्था, सह जोखीम गट (जेएलजी) सहकारी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेऊ शकतात. 

या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा असून, अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवास पुरावा (मतदान ओळखपत्र वीज देयकाची प्रत ) छायाचित्र, बँकेचा रदद केलेला धनादेश इत्यादी अपलोड करणे अनिवार्य असून अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिर्टन, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र जीएसटी नोंदणी इत्यादी सादर करावे.

सदर योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न अर्जाचा नमूना इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेत स्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेत स्थळ https://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्‍हा परिषद, अहमदनगर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

Back to top button