महाराष्ट्र

रुग्णालयाची तोडफोड करणारा जेरबंद

महासंदेश : पुणे जिल्ह्यातील कोंढव्यात दुकानांची व रुग्णालयाची तोडफोड करुन दहशत पसरविणाऱ्या  अरबाज इलियाज खान उर्फ लॅब याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना कोंढवा खुर्द येथील अशरफनगरमध्ये घडली.

याप्रकरणी एका वैद्यकीय तज्ञाने फिर्याद दिली आहे. लॅब आणि त्याचा भाऊ दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी 7 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने “हम इथरके भाई है’ असे म्हणत परिसरातील दुकाने आणी वाहनांची तलवारीने तोडफोड केली. त्यांना विरोध करणाऱ्या बेकरी व रिक्षावाल्यांवर त्यांनी हल्ला केला. यामध्ये बेकरीवाल्याच्या हाताला जखम झाली. त्यांची परिसरात दहशत असल्याने त्या दिवशी कोणीच तक्रार दाखल केली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा त्यांनी परिसरात तलवारी घेऊन राडा घातला. यातील आरोपींवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॅबला अटक करण्यात आली असून 13 जून पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वराज्य पाटील करत आहेत.

Back to top button