अहमदनगर

रुग्ण असलेल्या भागात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश

अहमदनगर : जिल्ह्याच्या काही भागात विशेषता ग्रामीण भागात अद्यापही करोना बाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. ग्रामसुरक्षा दल आणि हिवरे पॅटर्न प्रमाणे गावात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी आता अधिक सक्रीय भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी अशा गावांना थेट भेटी देऊन पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, रोहिणी नऱ्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, डॉ. बांगर, डॉ. भागवत दहिफळे हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, विशेषता सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.

Back to top button