Travelअहमदनगर

लाचखोर तलाठी जेरबंद

फेरफार नोंद करण्याकरिता शेतकऱ्याकडून 20 हजारांची केली होती लाचेची मागणी

अहमदनगर : शेतीचे वाटणी पत्र तयार करून त्या आधारे फेरफार नोंद करण्याकरीता शेतकर्‍याकडून 12 हजार रूपयांची लाच घेताना गुरव पिंपरी (ता. कर्जत) येथील तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. चंद्रकांत गजाबा बनसोडे (वय 56 रा. भिंगार) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. बनसोडेसह त्याच्या सोबतचा खाजगी इसम अमित सर्जेराव शिर्के (रा. चांदा ता. कर्जत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार यांनी त्यांचे चुलत भावाचे गुरव पिंपरी गावातील शेतीचे वाटणी पत्र करुन त्या आधारे फेरफार नोंद करणेकरिता गुरव पिंपरी तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. त्या आधारे फेरफार नोंद करणेकरिता तलाठी बनसोडे व खाजगी इसम शिर्के यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये बनसोडे व शिर्के यांनी पंचासमक्ष 20 हजार लाचेची मागणी करुन तडजोड अंती 12 हजार स्विकारण्याचे मान्य केले. यावेळी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित लाच मागणी दरम्यान बनसोडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस कर्मचारी रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, हरुन शेख, राहुल सपट यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान बनसोडेविरुद्ध सन 2014 मध्ये खर्डा (ता. जामखेड) येथे सापळा कारवाई झालेली असून सध्या सदर प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले.

Back to top button