महाराष्ट्र

वाहनाच्या धडकेत माय-लेकाचा मृत्यू

महासंदेश : औरंगाबाद येथील वाळूज येथे राहणाऱ्या भाच्याचे लग्न आटोपून दुचाकीवरून गावी निघालेल्या माय-लेकास समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात माय-लेक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास नवीन बायपास रोडवरील गांधेली शिवारात घडली.

कौशल्याबाई किशन धोत्रे (४५) व ज्ञानेश्वर किसन धोत्रे (२५, दोघेही रा. राजपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड), अशी या अपघातात मरण पावलेल्या माय-लेकाची नावे आहेत. वाळूज येथे कौशल्याबाई धोत्रे यांचा भाऊ राहत असून त्याच्या मुलाचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले. लग्नसमारंभ आटपून हे दोघे माय-लेक रविवारी दुपारी सोलापूर-धुळे महामार्गाच्या नवीन बीड बायपासवरून दुचाकीवरूनं (एमएच२३- व्ही- १८६२) गावी निघाले होते. नवीन बायपासवरून जाताना गांधेली शिवारात समोरून भरधाव येणाऱ्या कारने (एमएच २०- इइ- ७४५५) ज्ञानेश्वर चालवत असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोघे माय-लेक हे दूरवर फेकले गेले. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील, सहायक फौजदार काशिनाथ लुटे आणि हवालदार संपत राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लगेच जखमी माय-लेक व कारचालक रावसाहेब बाबूराव मदगे (रा. एकोड पाचोड, ता. औरंगाबाद) यांना घाटी दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. कारचालक रावसाहेब मदगे हे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button