विजय पठारेसह ५ जणांना मोका

अहमदनगर : येथील गुन्हेगारी वृत्तीचा विजय राजू पठारे व त्याच्या ५ साथीदारांंविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, बंडू उर्फ सूरज साहेबराव साठे, अनिकेत विजू कुचेकर, प्रशांत उर्फ मयूर राजू चावरे व अक्षय गोविंद शिरसाठ अशी त्या सर्वांची नावे आहेत. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
या सर्वांविरूध्द मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तोफखाना पोलिस ठाण्याअंतर्गत जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार पाटील यांच्यामार्फत नाशिकच्या पोलिस महानिरीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला काल मान्यता देण्यात आल्याने या सर्व आरोपींविरुद्ध आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पठारे व त्याच्या ५ साथीदारांनी तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, जबर चोरी, घातक शस्त्रांचा वापर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, अनधिकृतपणे घरात प्रवेश करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गैर कायद्याची मंडळी जमविणे, विनयभंग करणे, हद्दपार आदेशाचा भंग करणे आदी प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीने संघटितपणे गुन्हे केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर आता मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.