विद्यार्थ्यांचे पन्नास टक्के शैक्षणिक शुल्क माफ करा

आरपीआय अल्पसंख्यांक विभागाची मागणी
अहमदनगर : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे अर्धे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात देण्यात आले.
यावेळी आरपीआयचे अल्पसंख्याक विभागचे शहर प्रवक्ता जमीर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, शहर उपाध्यक्ष जावेद सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यातील खासगी इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांनी पुढील वर्षाचे शैक्षणिक शुल्क मोठ्या प्रमाणात आकारलेले आहे. तर ज्या पालकांनी शैक्षणिक शुल्क भरले नाही त्यांच्याकडे वारंवार फी भरण्याचा तगादा सुरु आहे. करोना महामारीत सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे उ द्योगधंदे मंदावले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणार्यांची अवस्था बिकट बनली आहे. हाताला काम नसल्याने अनेक लोक कर्जबाजारी झाले आहेत. अनेक खासगी शाळांकडून फी बाबत तगादा लावला जात आहे, असे ही निवेदनात म्हटले आहे.