अहमदनगर

विशेष पोलीस महानिरीक्षक अवस्थी दोर्जे

अहमदनगर : प्रलंबित असलेले गुन्हे निकाली काढून पसार असलेल्या आरोपींना अटक करावी, दाखल गुन्ह्यांचा तपास तात्काळ करावा, असे आदेश नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अवस्थी दोर्जे यांनी जिल्हा पोलिसांना दिले आहेत.
महानिरीक्षक दोर्जे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नगर जिल्हा दौरा केला. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील पोलिस विभागाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा आढावा त्यांनी घेतला. लॉकडाऊन काळात ज्या केसेस केलेल्या आहेत, त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येईल का हे पाहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सध्या करोनाचा विषय सुरू आहे. त्यामुळे उपाययोजनांबरोबरच खबरदारीही सर्वांनीच घेतली पाहिजे. म्हणून आता नव्याने बीट मार्शल प्रत्येक ठिकाणी कार्यान्वित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
करोनााच्या संभाव्य तिसरी लाटेचा धोका आहे. त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. ज्या पोलिसांचे लसीकरण झाले नाही, तेसुद्धा तात्काळ पूर्ण करावे. तसेच जे पोलीस कर्मचारी करोनातून बरे झालेले आहेत व आता घरी उपचार घेत आहे, अशांच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या उपचार पद्धतीची माहिती सातत्याने घ्यावी, अशा सूचनाही दोर्जे यांनी गेल्या आहेत.

Back to top button