वीज पडून पाच जणांचा मृत्यू

महासंदेश : राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर विद्युतखांब व ताराही तुटल्या. पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर नगर, नाशिक आणि लातूर जिल्ह्यांत वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे वीज अंगावर पडून महिलेसह चार शेळ्या ठार झाल्या. नगर जिल्ह्यात पारनेर, श्रीगोंदा, जामखेडमध्ये पाऊस झाला.
पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरीतील खेड परिसरात मुसळधार पाऊस बरसला. रायगडमधील पाेलादपूर, माणगाव, महाड, म्हसळा या तालुक्यांतील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात उसाच्या शेतात खत टाकत असताना वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. लातूरमध्ये झाडाखाली थांबलेल्या आजी व नातीचा वीज पडून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे ५० पेक्षा जास्त घरावरील पत्रे उडाले. विद्युतखांब व ताराही तुटल्या आहेत. विदर्भातील वाशिम, बुलडाणा, नागपूर, वर्धा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला.