महाराष्ट्र

शुक्रवारी ‘भाजपा’ काळा दिवस पाळणार!

महासंदेश : स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या देशातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी २५ जून रोजी भाजपा तर्फे राज्यभर काळा दिवस पाळण्यात येणार असून या विषयासंदर्भात विविध संवाद कार्यक्रम केले जाणार आहेत त्याचे राज्यभरात संयोजन भारतीय जनता युवा मोर्चा करीत आहे अशी माहिती पुणे जिल्हा   भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे व संघटन सरचिटणीस संदिप सातव  यांनी आज प्रसार माध्यमांना दिली.

२५ जून १९७५ या दिवशी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली, आणि देशभर दमनसत्रसुरू झाले.  अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात काँग्रेसने सत्तेचा व बळाचा अमानुष वापर करून देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण केले. मानवाधिकारांचे व माध्यमस्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २५ जून रोजी राज्यात जिल्हा स्तरावर भाजपच्या वतीने व्हिडियो कॉन्फऱन्स, पत्रकार परिषदा व समाजमाध्यमांद्वारे आणीबाणीच्या जखमांच्या जाणीवा समाजास करून देण्यात येतील. आणीबाणीसारखा कडवट काळ देशात पुन्हा कधीच येऊ देणार नाही असा निर्धार राज्यातील हजारो तरुण व भाजप कार्यकर्ते या दिवशी करतील. त्या काळ्या दिवसांतील अत्याचाराच्या कटु प्रसंगांची देशातील तरुणांना वेळोवेळी आठवण करून दिली तरच हा निर्धार टिकेल व लोकशाहीचे संरक्षण होईल, त्यामुळे देशातील तरुणांना स्वतंत्र भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाची माहिती असणे व त्यातून धडा घेणे गरजेचे आहे अशी भाजयुमोची भावना आहे, असेही किरण दगडे व संदिप सातव  यांनी सांगितले.

Back to top button