अहमदनगरकृषी

शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीचे दरवाजे खुले : पोपटराव नवले

अहमदनगर : महिला शेतकर्‍यांनी शेती उद्योगात पुढे येण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी शासन कृषी विभागाच्या वतीने विविध योजना राबविते. बचतगटांमुळे महिलांचे सक्षमीकरण होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य मिळाले. त्यामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत झाली. बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी करून अधिक उत्पादन घ्यावे. या पद्धतीद्वारे पेरणी केल्यास त्याचे लाभ त्यांना मिळू शकतील. खताचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न वाढेल. शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीचे दरवाजे खुले होतील, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान प्रात्यक्षिक प्रकल्प सन 2021-22 अंतर्गत देहरे येथे शेतीशाळेप्रसंगी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक के. डी. मदने यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. याप्रसंगी नवले बोलत होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, देहरे पं. स. सरपंच हिराबाई करांडे, उपसरपंच अनिल करांडे, सदस्य व्ही. डी. काळे, अण्णासाहेब चोर, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब काळे, राजेंद्र काळे, अमोल काळे, प्रवीण करांडे, ग्रामरोजगार सेवक व शेतकरी उपस्थित होते. महिला शेतीशाळा व प्रात्यक्षिक प्रकल्पाचे नियोजन के. डी. मदने यांनी केले. उपस्थितांनी सोयाबीन पेरणीची पाहणी केली.

नवले पुढे म्हणाले की, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. कृषी उद्योग ही एक कारखानदारी आहे. या उद्योगावर आधारित अनेक छोटे-मोठे व्यवसाय चालतात. कृषी उद्योग प्रक्रिया उद्योगामध्ये महिला शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतीशाळेचे आयोजन केले असून, यात मोठ्या संख्येने महिला शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे. बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी होईल. सोयाबीनला मोठी मागणी असते. अनेक दृष्टीने शारीरिकदृष्ट्या सोयाबीन लाभदायक आहे. बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणीची अधिकाधिक माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवली जात असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी महाडिबीटी नोंदणी, निवड प्रक्रिया व यांत्रिकीकरण योजना याबाबत शेकडे यांनी सविस्तर माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी यांनी आभार मानले.

Back to top button