संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गरजले; एक इंचही जमीन कोणाला घेऊ देणार नाही

भारताची एक इंच जमीनही कोणत्याही देशाला मिळू देणार नाही असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केले आहे. ते लडाख सीमेच्या स्थितीबद्दल माहिती देत होते. यावेळी त्यांनी बोलताना चीनला इशारा दिला. ‘एक इंच जमीन कोणाला घेऊ देणार नाही. दोघांनीही एलओसीचा आदर करावा. चीन सोबत चर्चा सुरु आहे. सीमेवर शांतता असणं गरजेचं आहे. घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत. १९६२ पासून सीमेवर अतिक्रमण सुरू आहे. देशाची अखंडता आणि सुरक्षा प्रश्नी सर्व एकत्र आहोत. असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.चीनशी सुरू असलेल्या बोलण्यांमध्ये भारताने काहीही गमावले नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. चीन उर्वरित मुद्द्यांबाबत गांभीर्याने विचार करेल अशी अपेक्षा असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितले. राजनाथ सिंह म्हणाले, अत्यंत प्रतिकूल आणि भीषण हिमवर्षावातही शौर्य गाजवणाऱ्या आपल्या सैन्याची प्रशंसा केली पाहिजे अशी मी सभागृहाला विनंती करतो. चीन आणि भारतातील सीमाप्रश्न चर्चेद्वारे सोडवला जाऊ शकतो. चीनबरोबर पेँगॉंगजवळील सैन्य तुकड्या दोन्ही देशांनी मागे घेण्याबाबत करार झाल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले . राजनाथ सिंह म्हणाले की, ‘लडाखमधील सीमेचे रक्षण करण्यात आमच्या सैनिकांनी मोठे पराक्रम दाखवले आहेत, म्हणूनच भारत चीनसमोर ठामपणे उभा आहे. आम्ही हे स्पष्ट केले आहे की या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याने माघार घेणे आवश्यक आहे.’