अहमदनगरमहाराष्ट्र

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कान्हू मोरे पसार

पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरणी केली होती अटक

अहमदनगर :  राहुरी येथील पत्रकार रोहिदास यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हा शनिवार दि.२८ रोजी  नगरच्या जिल्हा रुग्णालयातून उपचार सुरू असताना पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाल्याची घटना घडली आहे.
 या घटनेने पोलिस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल रोजी अपहरण करून त्यांची निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती.
या घटनेतील आरोपी लाल्या ऊर्फ अर्जून विक्रम माळी, तौफिक मुक्तार शेख, अक्षय कुलथे तसेच मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे यांना अटक करण्यात आली होती. हे चारही आरोपी राहुरी येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.
दरम्यान कान्हू गंगाराम मोरे हा कोरोना बाधीत झाल्याने त्याला १६ ऑगस्ट रोजी उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. तसेच त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान  मोरे हा पोलिसांना गुंगारा देऊन रूग्णालयातून पसार झाला. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. पोलिस पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. एकीकडे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याकांडातील आरोपी अनिल गावडे हा अद्याप पसार आहे. पोलिस प्रशासन त्याचा शोध घेण्यास असमर्थ ठरत आहेत. तर दुसरीकडे कान्हू गंगाराम मोरे हा अटक असलेला आरोपी रूग्णालयातून पसार झाला आहे.

Back to top button