अहमदनगर

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून दोघा जणांना साडे आठ लाखाला लुटले

अहमदनगर : गुप्तधन सापडलेले असून त्यातील सोने अतिशय कमी किंमतीत देण्यात येईल, असे आमिष दाखवून औरंगाबाद येथील दोघा जणांना 8 लाख 34 हजार रूपयांना लुटल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात मंगळवारी (दि.20) सायंकाळी घडली. याबाबत मिलिंद कान्हाजी काशिदे (वय-36, रा. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, हल्ली रा. उस्मानपूरा, औरंगाबाद) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी संदीप धागे याने आपणाशी संपर्क करत नगरमध्ये गुप्तधन सापडलेले असून त्यातील सोने स्वस्तात मिळवून देतो, असे आमिष दाखवून पैसे घेवून नगरला यायला सांगितले. त्यानुसार फिर्यादी मिलिंद काशिदे व त्यांचा बंधू, असे दोघे जण मंगळवारी (दि.20) नगरमध्ये आले. त्यानंतर त्यांना नगरपासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या सारोळा कासार परिसरातील रेल्वे स्टेशनजवळील सुनसान ठिकाणी बोलाविण्यात आले. त्यावेळी 8 ते 10 अज्ञात इसमांनी या दोघा बंधूंवर अचानक दगडाने हल्ला चढविला. तसेच लाथाबुक्यांनी जबर मारहाण करीत त्यांच्या जवळील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, विविध कंपन्यांचे मोबाईल, घड्याळ असा 8 लाख 34 हजार रूपये किंमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला व तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मिलिंद काशिदे यांनी नगर तालुका पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी संदिप धागे याच्यासह 8 ते 10 इसमांविरूध्द फसवणूक तसेच दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button