Travelकृषीमहाराष्ट्र

११ जुलैनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता

महासंदेश : पावसाने ओड दिल्याने शेतकर्याची चिंता वाढली आहे. त्यात शुक्रवारी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील रविवारपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असून ११ जुलैनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 त्याचबरोबर पोषक वातावरण नसल्याने २० जूनपासून मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटून आले आहेत. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकणातील पणजी, राजापूर येथे हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा आणि पन्हाळा येथे पावसाची नोंद झाली असून विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला होता. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. गेल्या आठवड्यात (२४ ते ३० जून) कोकण,  मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असणार्‍या घाटमाथ्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणावर पावसाने ओढ दिली आहे. अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, औरंगाबाद या ६ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात पावसात ६० टक्क्यांहून अधिक तूट आढळून आली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी पाऊस झाला आहे. पाऊसयाबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, विषवृत्तीय भागातील आफ्रिकेत पावसाला सुरुवात झाली की, तेथील शुष्क हवा आपल्याकडे ढकलली जाते. या हवेत धुलीकणांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आकाशात काळे ढग दिसत असले तरी ते उंचावर जाण्यास हे धुलीकण रोखतात. ढगांची निर्मिती झाली या ढगांमध्ये बाष्प असले तरी बाहेरील हवेतील शुष्क हवा त्यांचे थेंबात रुपांतर करण्यापासून रोखले जाते. त्या ढगांमधील पाणी कमी होते.

पुढील २ आठवड्यांचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यात पहिल्या आठवड्यात (२ ते ८ जुलै) कोकणात सरासरीपेक्षा कमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतका, मराठवाड्याच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.दुसऱ्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) पावसाला सुरुवात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात अधिक तर पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Back to top button